गणेश सुळ
केडगाव : उन्हाळ्यात शेतकर्यांसाठी वरदान ठरत असलेला वरवंड (ता. दौंड) येथील व्हिक्टोरिया तलाव दौंड-बारामती तालुक्याची जीवनदायीनी ठरत असतो. परंतु यावर्षी उन्हाळा सुरू झाला असून, ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया तलावात अवघा ७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने दौंड तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीटंचाई भेडसावत आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. वरवंड जलाशयात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला नसल्याने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कुरकुंभ एमआयडीसीतील सर्व कंपन्यांना पाणी जपून वापरण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामपंचायतीला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने १० ते १२ दिवसांत वरवंडच्या तलावात खडकवासला धरणसाखळीतून पाणी येण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. व्हिक्टोरिया तलावावर दौंड तालुक्यातील कुसेगाव, पडवी, खोर, नारायणबेट, देऊळगावगाडा, वरवंड, कडेठाण, कानगाव, गिरीम आणि पाटस हद्दीतील तसेच पूर्वेकडील गावांना सध्या पाण्याच्या टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
या तलावातून दौंड तालुक्यातील ८ गावांना पाणीपुरवठा केला जातो. कुरकुंभ औद्योगिक वसाहत, वायनरी प्रकल्प, बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई योजनेलाही याच तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सद्य:स्थितीत अपुरा पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे.
सध्या वरवंड तलावातील पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. खडकवासला धरणसाखळीतून आवर्तन येईपर्यंत या गावांनी व कुरकुंभ औद्योगिक वसाहतीने पाणी काटकसरीने वापरावे. अद्याप इंदापूर तालुक्याला पाणी पोहचले नसल्याने वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव भरण्याची तारीख अजूनतरी निश्चित नाही.
– राहुल वर्हाडे, शाखा अधिकारी, खडकवासला जलसंपदा विभाग, वरवंड