लोणी काळभोर :गावागावात कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळे फंडे राबविले जातात. अशातच “कचरा टाकणाऱ्याची बायको पळुन जाईल” असे फलक कुंजीरवाडी ( ता. हवेली ) येथे झळकल्याने नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत चर्चेला उधाण आले आहे. काय बायको पळून जाईल, बाप रे.. नको रे बाबा…कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीतच टाकू या…अशी चर्चा पुरूष वर्गात रंगलेली पाहावयास मिळत आहे.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहे. मात्र या शासकीय योजनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नियमांचे उल्लंघन करून नागरिक सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच संसर्गजन्य आजारांचा शिरकाव होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना वटणीवर आणण्यासाठी येथे कचरा टाकणारा डुक्कर (वराह) आहे, अशी फ्लेक्स बाजी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील पर्यावरण संरक्षण समितीने केली आहे. अशी आगळीवेगळी फ्लेक्सबाजी करणारी ही समिती पुणे जिल्ह्यातील पहिली ठरली आहे.
कुंजीरवाडी पर्यावरण संरक्षण समितीने या फ्लेक्समध्ये असे लिहिले आहे की, येथे कचरा टाकणारा डुक्कर आहे, येथे कचरा टाकणाऱ्याची बायको पळुन जाईल,” नवरा मरेल, पोरं गंगेवर भीक मागतील, म्हणुनच कचरा घंटा गाडीतच टाकावा, असे आवाहन केले आहे. हे फ्लेक्स कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावले आहेत.
दरम्यान, समितीने केलेल्या या फ्लेक्सबाजीमुळे नागरिक कचरा व्यवस्थापन योग्य करतील का? कचरा कचराकुंडीत टाकतील का? याचा गावाला कितपत फायदा होईल. गाव कचरामुक्त होईल का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील काही दिवसांत मिळतील.
कुंजीरवाडी पर्यावरण संरक्षण समितीचे होतेय सर्वत्र कौतुक
कचरा व्यवस्थापन करून रोगराई व प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी फ्लेक्स बाजी करून कुंजीरवाडी पर्यावरण संरक्षण समितीने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. नागरिकांनी जागृत करण्यासाठी सामितीने राबविलेल्या या उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
काय करायला हवे…
‘वापरा आणि फेका’ ऐवजी ‘वापरा आणि पुन्हा वापरा’ अशी सवय लावून घ्या. प्लास्टिक डबे, बाटल्या अशा वस्तू आपण पुन्हा वापरल्या पाहिजे. वापरलेले सर्व कागद कोरडे ठेवणे, पाठमोरे कागद वापरणे, कुठल्याही कागदाच्या वा प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे न करणे, वापरलेली पाकिटे-पिशव्या पुन्हा वापरणे, काचेचे ग्लास व कप वापरणे, जुन्या वस्तू कचऱ्यात टाकू न देणे, वस्तू दुरुस्त करून वापरणे होय.
पर्यावरण संरक्षण समितीमध्ये सन २०१७ पासून काम करीत आहेत. एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी उपयोजना करीत असताना दुसरीकडे गावामध्ये व गावाच्या भोवती कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत होते. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपण काहीतरी करावे, अशी इच्छा होती. त्यामुळे मित्रांना एकत्र करून आठवड्यातून एका दिवशी गावाची स्वच्छता करीत होतो. मात्र, यामुळे नागरिकांना कचऱ्याचे गांभीर्य समजणार नाही. त्यांना स्वत:ला जाणीव व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी या प्रकारचे फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सच्या माध्यमातून नागरिक जागृत होतील. कुंजीरवाडी गाव एक दिवस नक्की कचरामुक्त होईल.
नंदकुमार सावंत (अध्यक्ष-कुंजीरवाडी पर्यावरण संरक्षण समिती)