पुणे : विनायक ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थेचे संचालक कुंडलिक मारुती घाटोळे यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं आज दुपारी दोन वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. घाटोळे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथे संध्याकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यातील डबल डेकर बस शिकवणारे पहिले प्रशिक्षक
मुंबई बीएसटी येथे त्यांनी डबल डेकर बस शिकण्याचा कोर्स 1971 साली पूर्ण केला. घाटोळे यांचा 72 वर्षाचा प्रशिक्षक म्हणून अनुभव आहे. ते 1971 रोजी पुण्यातील डबल डेकर बस शिकवणारे पहिले प्रशिक्षक आहेत. त्यांच्या प्रशिक्षण संस्थेला सुद्धा अमानांक मिळाले आहे.
महानगरपालिका वाहन व्यवहार समिती पुणे येथे डबल डेकर बस मुंबईवरून आणून यशस्वी ट्रेनिंग देण्याचे काम त्यांनी केले. तसेच पुणे महानगरपालिका वाहन व्यवहार समिती ट्रेनिंग विभागाचे चालक प्रशिक्षण विभाग प्रमुख या पदावर त्यांनी काम केले. डबल डेकर जोड आणि पीएमटी बस सर्विस या सर्व प्रकारच्या बसेस प्रशिक्षणाचे काम घाटोळे यांनी यशस्वीरित्यापार पाडले.
स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी कोळशावरच्या गाड्या चालवण्याचे काम केलं. 1948 व 1949 दोन वर्ष महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट मध्ये ड्रायव्हर म्हणून काम केले. एक मार्च 1950 पीएमपीएलच्या स्थापनेपासून 1985 पर्यंत त्यांनी संस्थेसाठी उत्कृष्ट ड्रायव्हर निर्माण करण्याचे काम केले.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुरू करावं असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुचवलं. यानंतर त्यांनी सरकारमान्य विनायक ड्रायव्हिंग स्कूल या प्रशिक्षण संस्थेची स्थापना 1985 रोजी केली. 75 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना परिवहन विभागाचा होता.