यवत : दौंड तालुक्यात सर्कलनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप शिबीर घेण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वसंत साळुंखे व दौंड तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड तालुक्यातील दौंड, गिरीम, देऊळगाव राजे, मलठण, रावणगाव, कुरकुंभ, पाटस, बोरीपार्धी, केडगाव, पारगाव, राहु, वडगाव बांडे, यवत, खामगाव, बोरीभडक, वरवंड या सर्कल विभागाअतंर्गत प्रत्येक सर्कलनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप शिबीर घेण्यात यावे. या शिबीरामध्ये महा ई-सेवा केंद्र संचालक व शासकीय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्याकरण्यात आल्या आहेत.
त्याशिवाय, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शालेय कामकाजात कुणबी दाखल्याची अत्यंत आवश्यकता असून कुणबी प्रमाणपत्र वाटप शिबीर घेतले, तर त्याचा लाभ सर्व सामान्य जनतेला घेता येईल, यासाठी लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.