योगेश पडवळ
Krushi Seva Kendra Strike : पाबळ : सविंदणे आणि आसपासच्या गावात कृषी निविष्ठा केंद्रांनी शासनाच्या जाचक अटींविरोधात तीन दिवसांचा संप पुकारला आहे. यामध्ये सर्वच दुकानदार सामील झाले आहेत. महाराष्ट्रातील बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने एमपीडीए कायदा लागू करण्यासाठी नवीन चार कायदे आणण्याचा मसुदा तयार केला आहे. प्रस्तावित विधेयकाच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातील बेट भागात बी-बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांनी गुरुवारपासून सलग तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारपासून बेट भागातील सर्व खते, औषधे, बी-बियाणे यांची दुकाने बंद आहेत. दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून उस्फूर्तपणे ‘बंद’ला प्रतिसाद दिला आहे. सविंदणे येथे जवळपास ३ दुकाने असून, ही सर्व दुकाने बंद होती. खते, औषधे, बियाणे विक्रेत्यांवर जाचक व अन्यायकारक असे विधेयक पारित करण्याचे शासनाच्या विचारात आहे. हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी विक्रेत्यांकडून होत आहे.
विक्रेते हे उत्पादक नाहीत. उत्पादन कंपन्या करत असतात. त्याच्यामुळे या कायद्यांना विक्रेत्यांचा विरोध आहे. यामुळे विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण होणार आहे. शासनाने विक्रेत्यांपेक्षा उत्पादकांवर कारवाई करण्याबाबतचे नियम, कायदे कडक करावेत.
‘एमपीडीए’ कायदा गुंडांविरुद्ध लावण्यात येतो. यामध्ये झोपडपट्टीतील गुंड, हातभट्टी दारुवाले, वाळू माफिया, तडीपार गुंड यांच्या विरोधात वापर केला जातो. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा कायदा करण्यात येणार आहे. त्यात सरकारची समिती पाहणी करणार असून, संबंधित बियाण्यांचे उत्पन्न कमी आल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव ही समिती देईल. त्यामुळे विक्रेत्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही द्यावी लागणार आहे.
मंगेश पडवळ, मालक, कृषी सेवा केंद्र, सविंदणे
अनेक शेतकऱ्यांना या संपाविषयी माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी दुकाने का बंद आहेत, याची चौकशी आसपास केली. तेव्हा त्यांना संपाविषयी समजले. ज्या शेतकऱ्यांना नियोजनाप्रमाणे औषध फवारणी व खते टाकायची होती, त्यांचे मात्र या संपामुळे हाल झाले.
– अमोल गबाजी लंघे, शेतकरी