पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून कोयता गँगची दहशत आहे. तसेच शहरात कोयता गँगच्या दहशतीबरोबरच गोळीबाराचे प्रकार देखील वाढले आहेत. पुणे पोलिसांनी नामचीन गुंडांची वरात काढल्यानंतरही शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. शहरात अनेकदा कोयता गँगने गाड्या फोडून भरदिवसा कोयत्याने वार केल्याची प्रकरणे ताजी असताना आता आणखी एक घटना समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरात कोयता गँगने अनेक दुचाकी आणि रिक्षा यांची तोडफोड करत नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.
बिबवेवाडी परिसरात गुरुवार 25 एप्रिल रोजी रात्री 11च्या सुमारास दहा ते पंधरा गुंडानी पाच रिक्षा, पंधरा ते वीस दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने हल्ला चढवत वाहनांचे नुकसान करून, दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हातात कोयते घेऊन काही मुलांनी गाड्यांची तोडफोड केली. यामुळे बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान या भागातील महिला, लहान मुले आणि नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत. असे प्रकार नियमित घडत असून, पोलीस या गुंडांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस कोयत्याची दहशत वाढत आहे. परंतु, पुणे पोलिस कोयता गँगची दहशत पूर्णपणे मोडीत काढण्यास सपशेल अपयश ठरत आहेत.