पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; लोहगाव परिसरात दुकानासह वाहनांची तोडफोड
पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढलं आहे. लोहगाव परिसरात कोयता गँगच्या गुंडांनी दुकानाची तसेच वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही, तर हातात कोयते नाचवतय रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना देखील धमकावलं. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ही घटना शनिवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास लोहगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दहशत माजविणाऱ्या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक कोयता गँगचे टोळके आले. त्यांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवत ‘आम्ही इथले भाई, आमच्या नादाला लागू नका’, असं म्हणत परिसरातील नागरिकांना धमकावले.
तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. चेनाराम चौधरी यांच्या दुकानातही कोयता गँगचे गुंड शिरले. त्यांनी दुकानात तोडफोड करत धुडगूस घातला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.