पुणे : पुणे शहर आणि परिसरात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोयते विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ऐन दिवाळीत कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी कोयता गॅंगच्या कारवाया रोखण्यासाठी शहराच्या मध्यवस्तीतील कोयते विक्री करणाऱ्या ठिकाणांवरून कोयते जप्त केले आहेत. असे असले तरी तरीही ऐन दिवाळीत कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. अक्षय मलाप्पा शिंगे (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे कोयता गॅंगच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शिंगे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अक्षय, त्याचे मित्र करण धिवार, मुज्जमीर शेख यांच्यासोबत दिवाळीची खरेदी करण्यासाठी टिळक रस्त्यावरील वस्त्र दालनात आले होते. त्यावेळी पदपथावरुन आलेल्या तिघांनी शिंगे याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्टे झाले नाही. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नानेकर करत आहेत.