अमित मुंडीक
पुणे: कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीच्या प्रकरणात धडाकेबाज तपास करत पुणे पोलिसांनी तब्बल २१ तोळे सोन्याच्या चोरीप्रकरणी एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून, जवळपास ३.४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रकरणाची माहिती अशी की, फिर्यादी महिला त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून मूळगावी गेल्या असताना, अज्ञात चोरट्याने घराचे लोखंडी व लाकडी दरवाजाचे कडी-कोयंडे व कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच सोसायटी ऑफिसमधील सीसीटीव्ही DVR चोरी करून नेला. या चोरीत एकूण २१ तोळे सोनं चोरीस गेल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन तपास पथके तयार करण्यात आली. सलग पाच दिवसांत १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून, आरोपीचा मागोवा घेण्यात आला.

गोपनीय माहितीवरून जेरबंद
तपासादरम्यान दिनांक १० जून २०२५ रोजी पोलीस अंमलदारांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदर चोरी अट्टल गुन्हेगार अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय ४७, रा. मांजरीगाव, हडपसर) याने केली असून तो मांजरीगावातील ७२ नंबर वस्ती परिसरात येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आणि गुन्ह्यात अटक केली. अटकेनंतर त्याच्याकडून पुढील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि सुमारे ₹४०,००० किंमतीची होंडा स्प्लेंडर मोटारसायकल यांचा समावेश आहे. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ₹३,४०,००० इतकी आहे. अटक करण्यात आलेला अर्जुनसिंग दुधानी हा पुणे शहर व परिसरात १५० हून अधिक घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ श्री. राजकुमार शिंदे, मा. सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नवनाथ जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, अंमलदार सैफ पठाण यांच्या तपास पथकाने केली आहे.







