कोंढवा: चाकू आणि गिलोरचा धाक दाखवून दुचाकी चोरल्याचा प्रकार बोपदेव घाट माथ्यावर घडला होता. या प्रकरणी दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दुचाकी आणि चाकू जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश संजय चव्हाण (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी, जि. नगर), चेतन सिताराम खैरे (रा. खैरेवाडी, ता. पुरंदर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी व त्यांचे इतर तीन मित्र दुचाकीवरुन फिरण्यासाठी बोपदेव घाटमाथ्यावर गेले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी एकाने चाकू व गिलोर दाखवून फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. त्यांच्याकडे पैसे नसल्याने आरोपींनी त्यांची दुचाकी चोरून नेली होती. घाटात होणाऱ्या जबरी चोरीच्या अनुषंगाने पोलिस ठाण्यातील तपास पथकाकडून आरोपींचा शोध घेतला जात होता.
पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून रस्त्याच्या बाजुला थांबुन संशयित वाहने व व्यक्तींचा शोध घेत दोघांना पकडले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, विशाल मेमाणे, निलेश देसाई, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.