पुणे : साद मोटर्स या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास महिना २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत निसार बाबुलाल शेख (वय ५५, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक कलंदर खान (वय ४४), सनोबर ऊर्फ सौदा रफिक खान (वय ४०), इसा रफिक खान (वय २३), TikTok मौलाना उर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान (वय ४८, सर्व रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठानगर येथे साद मोटर्स नावाचे कार्यालय आहे. आरोपींनी फिर्यादी यांना साद मोटर्स नावाच्या गाड्यांचे खरेदी विक्री व्यवसायात पैसे गुंतविल्यास दर महा २ ते ३ टक्के परतावा देतो, असे आमिष दाखविले होते. त्यानुसार फिर्यादी व अनिकेत गायकवाड, हमीद बाबुलाल शेख, जुलेखा समीर शेख, अझीम राजूभाई मुलानी, संदीप बधे, जहांगीर पठाण, विशाल चव्हाण, समीर रज्जाक शेख यांनी तब्बल १ कोटी १६ लाख ९३ हजार ५०० रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर गेल्या चार वर्षात आरोपींनी परतावा तसेच मुद्दलही परत दिली नाही. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिसंबंधाचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.