कोहिंडे बुद्रुक/तळवडे :भामा-आसखेड धरण जलाशयातून थेट कोहिंडे बुद्रुक आणि तळवडे या टँकरग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या ५ कोटी रुपये निधीच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि.११) झाले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत भूमिपूजन केले.
केंद्रीय जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची विशेष मदत घेऊन खास बाब म्हणून या पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी शरद बुट्टे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. या गावांसाठी स्थानिक जुन्या विहिरीवरूनच पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशन योजनेतून मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु ऐन उन्हाळ्यात या दोन्ही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.
ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मंजूर केलेल्या दोन्ही योजना रद्द करून थेट भामा आसखेड धरण जलाशयातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा आराखडा तयार केला होता. परंतु, त्यास मान्यता मिळत नव्हती. कारण यासाठी या योजनेतून मंजूर केलेल्या व कार्यारंभ आधीच झालेल्या योजना रद्द करावी लागणार होत्या. यासाठी शरद बुट्टे पाटील यांनी थेट दिल्लीतून प्रल्हाद सिंह पटेल आणि सचिवांची मदत घेऊन ही योजना खूप मेहनतीने मंजूर करून घेतली होती.
यासाठी जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी विशेष सहकार्य केले.
या योजनेचा नुकताच कार्यारंभ झाल्यानंतर आज स्थानिक नागरिकांनी विशेष करून महिलांच्या हस्ते या दोन्ही गावांमध्ये जाऊन कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महिलांनी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कारण वर्षोनवर्षे ही गावी टँकरने पाणी घेत होती. आता या गावांना बारमाही पाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमात शरद बुट्टे पाटील, कोहिंडे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा रामदास कचाटे, माजी उपसरपंच सुदाम कुटे, सुभाष हगवणे, मारुती वाळुंज यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे आभार भाजपचे जिल्हा सरचिटणीस माजी सरपंच संजय रौंधळ यांनी मानले.
View this post on Instagram
यावेळी रोहित डावरे पाटील, तळवडेचे सरपंच सुषमा बाबाजी हागवणे, उपसरपंच निर्मला सत्यवान पांनमंद, ग्रामपंचायत सदस्या वेणुबाई बोंबले, सुशिला यशवंत वाळुंज, रविंद्र वाळुंज, सुभाष हगवणे, बाळू भालेराव तसेच कोहिंडे बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुटे, अमोल पिंगळे, सीताराम खंडे, वैशाली कचाटे, मनिषा रौधळ, कुंदा जाधव, काजल घोलप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामी जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव तसेच या योजनेचे काम पाहणारे राज्याचे सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे ,आमचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आणि आमचे उपअभियंता आणि शाखा अभियंता यांनी आम्हाला विशेष मदत केली.
– शरद बुट्टे पाटील