सागर जगदाळे
भिगवण : किशोरवयीन मुलांकडून अनवधानाने चूक झाल्यास घरातील आई-वडिलांना सांगितली पाहिजे. आई-वडील चूक माफ करू शकतात. परंतु या चुकांचा दुसऱ्याने गैरफायदा घेतला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. चांगले आदर्श ठेवून भावी वाटचाल केली तर भविष्य उज्ज्वल होऊ शकते; परंतु आदर्श चांगले ठेवले नाहीत, तर येणारा काळ अंधकारमय होऊ शकतो, असे प्रतिपादन इंदापूर न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश स्वानंदी वडगांवकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये इंदापूर तालुका विधीसेवा समिती, वकील संघ आणि भिगवन पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॉमन मिनिमम’ कार्यक्रमांतर्गत भिगवण येथील श्याम गार्डन मंगल कार्यालयामध्ये कायदेशीर शिबीर आयोजित केले होते. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना वडगांवकर यांनी हे मत व्यक्त केले. वडगावकर पुढे म्हणाल्या की, कायद्यातील अज्ञान हा बचाव कायद्याला मान्य नाही, त्यामुळे कायद्याचे ज्ञान तळागाळात पोहोचले पाहिजे. सध्या कायद्याच्या चौकटीत विचार करता समाजातील सर्वांत असुरक्षित घटक हा किशोरवयीन असून, या वयात घरातील आई-वडील हे शत्रू वाटतात, तर बाहेरचे आदर्श वाटायला लागतात. या वयामध्ये सद्सद््विवेक बुद्धी जागृत ठेवून, सामाजिक भान ठेवून विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. तसेच सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करणे गरजेचे आहे.
सोशल मीडियामुळे अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, याबाबत देखील त्यांनी भाष्य केले. कायद्याचा चांगला वापर करून आपले भविष्य उज्वल करावे तसेच रस्ते अपघाताबाबत सर्वांनी नियमांचे पालन करून आपल्यामुळे इतर कोणाच्याही जीविताचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन रस्त्यावरील नियमांचे पालन करावे, असे मत व्यक्त केले.
कायदेविषयक शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश, वकील व पोलीस या सर्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. इंदापूर न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश के. सी. कलाल यांनी वाहतुकीच्या नियमाविषयी मार्गदर्शन केले. ॲड. शरद जामदार यांनी पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले. ॲड. आशुतोष भोसले यांनी सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी इंदापूर न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कृष्णाजी यादव, ॲड. एन. एस. शहा, ॲड. मधुकर ताटे, ॲड. दिलीप गिरंजे, ॲड. रणजित चौधरी, ॲड. शिवाजी नगरे, ॲड. श्याम शिंदे, ॲड. संजीव मोरे, ॲड. रणजीत शितोळे, ॲड. सुभाष भोंग, ॲड. स्वप्निल जगताप, ॲड. संदीप बांदल, ॲड. सुधीर वाकळे, ॲड. ज्योती जगताप तसेच अनेक वकील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भिगवण परिसरातील सर्व शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. माधव शितोळे देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन वकील संघटनेचे सचिव ॲड. असिफ बागवान यांनी केले व आभार ॲड. पांडुरंग जगताप यांनी मांडले.