पुणे : नववर्षातील सर्वात महत्वाचा आणि प्रथम सण म्हणजे मकरसंक्रांत होय. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. हा सण जानेवारी महिन्यात १४ किंवा १५ जानेवारीला साजरा करण्यात येतो. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या सणाला मकरसंक्रात असे म्हणतात.
एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हिंदू धर्मातील हा सण आहे. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे. या दिवशी सर्व मित्रमंडळी, लहान मुले हे तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वडया वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’अशा शुभेच्छा देतात.
दरम्यान, संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे व तिळगूळ यांचा समावेश असतो. चला तर आपण मकरसंक्रांतीबद्दल अजून माहिती जाणून घेऊयात.
१)मकरसंक्रांतीचा मुहूर्त
मकरसंक्रांती शुभमुहूर्त – रविवारी (सकाळी ०७:३६ ते संध्याकाळी ०६:३१ )
कालावधी – १० तास ५५ मि.
मकरसंक्रांती महापुण्यकाळ – सकाळी ०७:३६ ते सकाळी ९: २५ .
कालावधी – ०१ तास ४९ मि.
२)मकरसंक्रात पौराणिक कथा
धार्मिक कथा नुसार असे मानले जाते की, मकरसंक्रांती च्या दिवसापासून देवलोक म्हणजेच स्वर्गाचा दिवस सुरू होतो. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असेही सांगितले आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते. या संदर्भात एक आख्यायिका आहे. या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील असुरांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवला असे म्हटले जाते,
३) वैज्ञानिक कारण
वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते.
४)तिळगुळाचे महत्त्व
तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात आणि खातात. शिवाय या सणानिमित्ताने कटू आठवणींना विसरून गोडवा भरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या सणाला “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”असे म्हणण्याची पद्धत पण आहे .
५)मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याचे महत्व
मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करण्याची प्रथा प्रचलित आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक अनेकदा घराच्या छतावरून पतंग उडवून हा सण साजरा करतात. हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि इतर अनेक संसर्गामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो.सूर्याच्या उतरत्या वेळी सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरासाठी औषध म्हणून काम करतात. पतंग उडवणाऱ्यांच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. म्हणूनच मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची पद्धत आहे.