पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात शुक्रवारी खून करण्यात आला. अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या. भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. शहरातील कोथरूड परिसरात दहशतीचे वातावरण होते. शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदाचा टोळी भडका उडणार,अशी चर्चा सुरू झाली आहे. मोहोळच्या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध रोखण्याचे मोइथे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. मारणे टोळीतील गुंड किशोर मारणे, संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी आणि मुळशीतील दासवे गावाचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण करून ४५ लाखांची खंडणी उकळल्यानंतर शरद मोहोळने गुन्हेगारी वर्तुळात आपला दबदबा निर्माण केला.
पुणे शहर आणि परिसरात २००० मध्ये मूळचे मुळशी तालुक्यातील असलेले व शहरात वास्तव्यास असणाऱ्या गणेश मारणे, गजानन मारणे, संदीप मोहोळ यांच्या टोळ्या उदयाला आल्या. मुळशीतील जमीन व्यवहार आणि वर्चस्वाच्या वादातून टोळ्यांमध्ये जोरदार खटके उडू लागले. यामधूनच शुक्रवार पेठेतील अनिल मारणे आणि नवी पेठेतील सुधीर रसाळ या दोघांचे खून झाले. त्यानंतर ४ ऑक्टोबर २००४ मध्ये संदीप मोहोळ याचा कोथरूडमधील पौडफाटा परिसरात भरदिवसा गोळ्या घालून खून झाला. याप्रकरणी गणेश मारणे आणि त्याच्या १७ साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. या खटल्याचा निकाल तब्बल चौदा वर्षांनी लागला. यामध्ये सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, तर अन्य सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.
सुरुवातीला शरद मोहोळ हा संदीप मोहोळच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. संदीपच्या खुनानंतर टोळीची धुरा शरदने सांभाळली. त्याने संदीपच्या खुनाचा बदला म्हणून गणेश मारणे टोळीतील किशोर मारणे याचा खून केला. शहरातील नीलायम चित्रपटगृहाजवळील एका बारमध्ये झालेल्या खुनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. या गुन्ह्यामध्ये शरद मोहोळ याच्याबरोबर हेमंत दाभेकर, दत्ता गोळे, योगेश गुरव, मुर्तझा शेख, अमित फाटक, दीपक भातरंबेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
पुढे जाऊन शरद मोहोळ याने ४५ लाख रुपये खंडणीसाठी दासवे गावाचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केले. त्या गुन्ह्यात मोहोळ आणि त्याचा साथीदार उत्तर प्रदेशात लपून बसले होते. त्या दरम्यान मेरठमध्येही दोघांनी एकाचा खून केला. या खटल्याची सुनावणी अद्याप सुरु आहे. फरारी शरद मोहोळ याला अटक केल्यानंतर त्याला येरवडा कारागृहातील अतिसुरक्षित अशा अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. ८ जून २०१२ रोजी मोहोळ आणि भालेराव यांनी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी कतिल सिद्दीकी याचा पायजमाच्या नाडीने गळा आवळून येरवड्यातील अंडा सेलमध्ये खून केला.
गेल्या काही वर्षांपासून मुळशी तालुक्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्या टोळ्यांमध्ये वैर निर्माण झाले होते. त्यानंतर मोहोळ याच्या साथीदारांनी शेलारवर हल्ला केला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता.