खेड : खेड तालुक्यातील चाकण येथील किरण रामराव शिंगाडे यांचा १८ डिसेंबर २०२२ मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांनी काढलेल्या टपाल जीवन विम्याची ५ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. हा धनादेश पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर बा. पो. एरंडे यांच्या हस्ते देण्यात आला.
किरण शिंगाडे यांनी ५ डिसेंबर २०२० मध्ये ५ लाखांचा विमा घेतला होता व त्यांनी महिन्याला नियमित हफ्ता १९७५ भरला होता. त्यातच १८ डिसेंबर २०२२ रोजी रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात वारसदार म्हणून त्यांची पत्नी अश्विनी किरण शिंगाडे यांना टपाल जीवन विमा योजनेतून ५ लाख ७८ हजार रुपयांचा धनादेश एरंडे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी डाक विभागाच्या टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेची माहिती सांगण्यात आली. या प्रसंगी शिवाजीनगर प्रधान डाकघराचे पोस्टमास्तर मारुती डिंबळे उपस्थित होते.
डाक विभागाची विमा योजना हिताची
डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना कर्मचारी, शेतकराच्या हितासाठी खूप चांगली आहे. या योजनेत कमी हफ्ता जास्त बोनस मिळतो. ग्रामीण भागातील व्यापारी, शेतकऱ्यांना १० लाखांचा तर सरकारी कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, डिप्लोमाधारक व पदवीधरांना देखील ५० लाखापर्यंत विमा घेता येतो. तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बा. पो. एरंडे यांनी केले.