पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरुड परिसरात गोळ्या झाडल्या. त्यानंतर रुग्णालयात उचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळ हा पुण्यातल्या मोहोळचा गँगचा सूत्रधार होता. ज्या परिसरात त्याचा भाऊ संदीप मोहोळची हत्या झाली, त्याच परिसरात शरद मोहोळचीही हत्या करण्यात आली. पण, आता यानंतर पुण्यात गँगवार भडकणार का? पुण्यात इतकं गँगवार का वाढला? पुण्यात गँगवारचा जन्म कसा झाला? जाणून घेऊयात सविस्तर
साधारण ही गोष्ट आहे 80 च्या दशकातील. त्यादरम्यान पुण्यात दोन गँग उदयास आल्या होत्या. त्यावेळी गुन्ह्याचे स्वरुप हे मटके, खंडणी, अवैध मालमत्ता अशा प्रकारचे होते. पुढे जाऊन 90 च्या दशकात पुण्याचा विस्तार वेगाने होऊ लागला, तशी पुण्याची जुनी ओळख पुसली जाऊ लागली. पुणे हे एक मोठं आयटी हब बनण्याच्या मार्गावर होतं. येथे मोठमोठ्या कंपन्या येत होत्या. त्यासाठी त्यांना जमिनीची गरज भासू लागली. परिणामी पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जमिनीच्या वेगाने किंमती वाढल्या. या परिसरात ज्यांच्या जमिनी होत्या ते लोक कोट्यधीश झाले. यातून आपण कोट्यधीश होऊ शकतो ही भावना अनेकांच्या मनात बळावली.
दरम्यान उद्योगपतींना जमीन हवी होती आणि ती मिळवून देण्यासाठी एजंट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. या जमिनी मिळवून देण्यासाठी दादागिरी आणि गुंडगिरीचा वापरही झाला. त्यातूनच पुढे पुण्यात गँगवारचा जन्म झाला. यामध्ये पहिली ठिणगी पडली ती 2005 मध्ये. मारणे टोळीतल्या अनिल मारणेवर हल्ला करून त्याचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. त्यानंतर 2006 मध्ये मारणे टोळीच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती आणि यानंतर खऱ्या टोळीयुद्धाला सुरुवात झाली.
संदीप मोहोळ गावचा सरपंच झाला
कुख्यात गुंड संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातला रहिवासी होता. त्याला आखाडा आणि पहिलवान या सगळ्या गोष्टींची मोठी आवड होती. जमिनी व्यवहारामध्ये पैसा आहे, हे संदीप मोहोळला लहानपणापासून माहित होते. तो वयाच्या 19 व्या वर्षी तो टोळीयुद्धात सक्रीय झाला. त्यानंतर जमिनींसाठी धमकावणे, बळाचा वापर करणे अशा गुन्ह्यांमध्ये संदीप मोहोळचं नाव पुढे येऊ लागले. पैसा आला आणि त्यापाठोपाठ त्याच्या गावची सत्ताही त्याला मिळाली आणि संदीप मोहोळ सरपंच झाला.
मारणेच्या हत्येनं गँगवॉर भडकलं
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून माथाडी कामगारांचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला. संदीप याने मारणे टोळीचे दोन सदस्यांची हत्या केली होती. त्यामुळे मारणे टोळी ही संदीप मोहोळच्या मागावर होती. अनिल मारणेच्या हत्येचा बदला मारणे टोळीला घ्यायचा होता. अनेक हल्ल्यातून संदीप मोहोळ वाचला देखील होता. पण, मुठा गावातून कोथरुडला येत असताना मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली. आता ज्या परिसरात शरद मोहोळला मारलं त्याच परिसरात त्याचा भाऊ संदीप मोहोळची हत्या झाली होती. संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळकडे गँगची सूत्र आली. त्यावेळी 2010 मध्ये मारणे गँगच्या किशोर मारणेची पुण्यात मोहोळ गँगकडून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.
या प्रकरणात सात आरोपींना जन्मठेप झाली आणि चार जण निर्दोष सुटले. यामध्ये शरद मोहोळलाही शिक्षा झाली होती. शिक्षा होऊन तुरुंगात गेल्यावरही शरद मोहोळ शांत बसला नाही. त्याने येरवडा तुरुंगात असताना इंडियन मुजाहिदीनचा सदस्य मोहंमद कातिल सिद्दिकीचा खून केला. त्यानंतर त्याने खुनाचे पुरावे नष्ट केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या प्रकरणात आरोपी मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. शरद मोहोळ हा किशोर मारणे हत्या प्रकरणात तुरुंगात होता. मात्र, त्याने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
पुण्यात गुंडगिरी करत असतानाच शरद मोहोळला त्याचा भाऊ संदीप मोहोळसारखेच राजाकरणाचे वेध लागले होते. यामध्ये फरक इतकाच होता की संदीप मोहोळने राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला होता. तर शरद मोहोळच्या पत्नी स्वाती यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शरद मोहोळ आपल्या पत्नीसोबत अनेक सामाजिक उपक्रमात सक्रीय झाला होता. त्याचा भाऊ संदीप मोहोळची ज्या कोथरुडममध्ये हत्या झाली होती, तिथेच शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या झाली. आता शरद मोहोळवर हल्ला कोणी केला? हा हल्ला गँगवारमधून झाला का? हे तपासात हळूहळू समोर येईलच.