यवत: पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र भुलेश्वर येथील पिंडीचे सूर्यनारायणाने आज दर्शन घेतले. संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात आज सूर्यनारायणाने मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगावर तब्बल १० ते १२ मिनिटे आपल्या सोनेरी किरणांनी अभिषेक घातला.
श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराच्या नगारखाण्यापासून सकाळी ०६.३७ मिनिटांनी सूर्यकिरणांनी शंभर फुटांपेक्षा अधिक अंतर असलेल्या मुख्य मंदिरात प्रवेश केला, तर ०६ वाजून ४१ मिनिटांनी सूर्यकिरणांनी श्री क्षेत्र भुलेश्वर मूर्तीस स्पर्श केला. यावेळी मंदिरातील मूर्ती सोनेरी दिसू लागली. तेज इतके होते की, मंदिरातील गाभारा सोनेरी दिसू लागला. यावेळी भुलेश्वराचे मनमोहक रूप पाहून लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. भुलेश्वर महाराज की जय, हर हर महादेवच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर ०६ वाजून ४९ मिनिटांनी सूर्यकिरण शिवलिंगापासून बाजूला गेले. यावेळी जवळपास सूर्यनारायणाने आपल्या सोनेरी किरणांनी १२ मिनिटे शिवलिंगावर अभिषेक घातला.
श्री भुलेश्वर मंदिर येथे दरवर्षी किरणोत्सव दोन वेळी पाहावयास मिळतो. सप्टेंबर महिन्यामध्येही किरणोत्सव होतो. मात्र, दरवर्षी हा योग जुळून येईल, असे नसते. कारण सप्टेंबर महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात. या काळामध्ये ढगाळ हवामान असते. यामुळे कधी-कधी सूर्य दिसतच नाही. त्यामुळे दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये किरणोत्सव होतोच, असे नाही. मात्र, २७ मार्च ते २९ मार्च असा सलग ३ दिवस किरणोत्सव असतो. २८ मार्च रोजी सूर्यकिरण शिवलिंगावरती मधोमध पडतात. त्याचबरोबर या काळात प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरही किरणोत्सव सुरू होता. हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.