पुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात एकाचा चौघांनी कोयत्याने व दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी परिसरातील विठ्ठलनगर येथे घडला आहे. शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भूमिपूत्र युवराज कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चिक्या ऊर्फ ओंकार जगताप व त्याचे तीन आणखी साथीदार अशा चौघांना माळवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वीरफकीरा कांबळे यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमिपूत्र कांबळे त्याचे मित्रासमवेत विठ्ठलनगर येथून जात असताना आरोपी चिक्या ऊर्फ ओंकार जगताप व त्याच्या साथीदारांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून भूमिपूत्र कांबळे याच्यावर कोयत्याने व दगडाने चेहऱ्यावर, कानावर, डोक्यावर व कमरेवर घातक वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भूमिपूत्राचा रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी घटनेची तात्काळ दखल घेत चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.