पिंपरी : खेड तालुक्यातील खालुंब्रे गावच्या हद्दीत पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचा कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना घडली होती. हि घटना सोमवारी (दि.1) सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील तपास पथकाने ४८ तासात ७ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई मावळ तालुक्यातील जांबवडे येथे करण्यात आली. गणेश अनिल उर्फ आण्णा तुळवे (वय-३० रा. खालुंब्रे, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी मयूर अशोक पवार (वय-३०, रा. समता कॉलनी, तळेगाव दाभाडे), विशाल पांडुरंग तुळवे (वय-३७), रणजीत बाळू ओव्हाळ (वय-२२), प्रथम सुरेश दिवे (वय-२१), विकास पांडुरंग तुळवे (वय-३५), सनी रामदास तुळवे (वय-२६), चंद्रकांत भीमराव तुळवे (वय-३८, सर्व रा. खालुंब्रे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत गणेश याचा भाचा प्रणय प्रदिप ओव्हाळ (वय-२१, रा. कान्हे फाटा, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणय आणि त्याचा मामा गणेश हे दुचाकीवरून खालुंब्रे गावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी गणेश पाठीमागे बसला होता. तळेगाव-चाकण रस्त्यावरील खालुंब्रे गावच्या हद्दीत हैद्राबादी बिर्याणी हाऊस समोर आले असता आरोपी पाठीमागून दुचाकीवरून आले. त्यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन गणेश याच्यावर कोयत्याने डोक्यात वार करुन निर्घृण खून केला. फियादी प्रणय हा सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याच्यावरही वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेऊन सनी तुळवे आणि चंद्रकांत तुळवे यांना ताब्यात घेतले. तर इतर आरोपी फरार झाले होते. दरम्यान, फरार आरोपी मावळ तालुक्यातील जांबवडे येथे एका घरात लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलाश कुथे करीत आहेत.