पुणे : पुण्यात मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. शहरात कोयत्याच्या हल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तमनगरमध्ये मित्रानेच मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. हि घटना ८ सप्टेंबर रोजी उत्तमनगर मासेअळी येथे दुपारच्या सुमारास घडली आहे. जयदीप भोडेकर (वय-२२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपी अमित गुजर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप आणि अमित हे दोघेजण एकमेकाचे मित्र आहेत. किरकोळ वादातून अमितने जयदीपचा खून केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, पुणे क्राईम सिटी होत आहे कि काय? अशी शंका आता पुणेकरांच्या मनात येऊ लागली असून पुण्यात दररोज अनेक गुन्हे घडतच आहेत.
त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चार दिवसांपूर्वी असाच एका व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. जुन्यावादातून हा हल्ला झाला होता. कोणाच्याही भीतीशिवाय दोन अज्ञात व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावर तरुणावर वार करत होते.
दरम्यान, आता उत्तमनगरमध्ये देखील अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणामुळे मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची घटना घडली आहे. त्या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणामुळे वाद झाला होता हे अद्याप समजू शकले नाही. उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी सुरु केली आहे. पुढील तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.