पुणे : भिवंडीत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला रस्ता परिसरातील सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनावणे (वय २२, रा. ताडीवाला रस्ता) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, भिवंडी शहरात १४ फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी करण हनुमंत लष्करे, दिनेश मारुती मोरे, चंदन उपेंद्रप्रसाद गौड, कैलास खंडू धोत्रे, आकाश परशुराम जाधव, विशाल विठ्ठल साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या आरोपींचा भिवंडी पोलिसांकडून शोध सुरु होता. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांना घटनास्थळावरचे सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच आरोपींचे छायाचित्र उपलब्ध झाले होते.
अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात ताडीवाला रस्ता परिसरात सराईत रामनाथ सोनावणे सामील झाल्याची माहिती मिळाली. तो ताडीवाला रस्ता परिसरातील नदीकिनारी शंकर मंदिराजवळ थांबला होता. या बाबतची माहिती तपास पथकाला मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांनी ही कारवाई केली.