पुणे : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून त्यांच्यावर सोलापुरला घेऊन जात त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. गेली नऊ वर्षे पसार असलेल्या आरोपीला वारजे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. माऊली सखाराम राजीवडे (रा. अथर्व बिल्डींग, कोंढवे धावडे, एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वारजे भागातील दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे विवाहाच्या आमिषाने धनंजय सखाराम राजीवडे आणि त्याचा भाऊ माऊली या दोघांनी अपहरण करून त्यांना सोलापुरात नेले होते. त्या ठिकाणी आरोपी माऊली आणि त्याचा भाऊ धनंजय तसेच दोन अल्पवयीन मुलांनी दोन्ही मुलींवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी धनंजय याला ५ एप्रिल २०१४ रोजी अटक करण्यात आली होती.
यानंतर त्याचा भाऊ माऊली फरार झाला होता. मागील नऊ वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. वारजे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांची नुकतीच नियुक्ती झाली होती. त्यावेळी गंभीर गुन्ह्यातील पसार आरोपींची माहिती त्यांनी घेतली. तेव्हा सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी माऊली पसार असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाेलीस शिपाई राहुल हंडाळ यांनी तांत्रिक तपास सुरु केला होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार माऊली एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले.