केडगाव / गणेश सुळ : न्हावरा ते चौफुला रस्त्याच्या कामाचा तपशील दडवून दबाव व दहशतीने सुरू असलेल्या कामाला खोपोडी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी विरोध केला. खोपोडी ग्रामपंचायतीने ही रस्त्याचे काम त्वरित थांबवावी आणि त्याच्या शासकीय कागदपत्रांची माहिती आम्हाला द्यावी, अशी लेखी मागणी केली.
या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून सध्या सुरू आहे. आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी कामाने अजून वेग धरलेला नाही. रस्त्याच्या विस्तारीकरणात पारगावपासून चौफुल्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असणार्या किती जमिनी संपादित केलेल्या आहेत. रस्ता किती रुंदीचा असून, तो कशाप्रकारे करण्यात येणार आहे, यामध्ये डांबरीकरण आहे की काँक्रिटीकरण, मजबुतीसाठी ते कोणत्या पद्धतीने केले जाणार आहे, कामाची मुदत किती आणि त्यावर खर्च किती होणार या तपशिलाची माहिती शासन नियमानुसार लावणे आवश्यक असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अधिकार्यांनीसुद्धा याची दखल घेतलेली नाही.
रुंदीकरणासाठी रस्त्यालगत असणार्या शेतकर्यांच्या जमिनी किती गेल्या याची माहिती त्यांना मिळत नाही. ठेकेदार कंपनी त्यांना दुसरीच माहिती देऊन दहशतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत ’रस्ता कामाच्या तपशिलाची माहिती दडवली असल्याने मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली. यातून खोपोडी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे काम बंद करून तत्काळ माहिती मिळावी, अशी मागणी केली आहे.
उंच आणि सखल असा रस्ता उकरून ठेवल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सहन कराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी पुलाची कामे रखडली (अर्धवट) असल्याने अपघाताची समस्या वाढली आहे. त्वरित मुरूम टाकून रस्ता प्रवासासाठी योग्य असा करून द्या. अन्यथा फौजदारी दाखल केली जाईल.
– सुनील सोडनवर, सरपंच बोरीपार्थी