पुणे: खेड-आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत दिवसे हे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगरचे प्रांताधिकारी असून ते सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पीएमआरडीएचे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी दिवसे यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंधाचा आधार घेतला असल्याचा आरोप जोगेंद्र कट्यारे यांनी केला आहे. कट्यारे यांनी आमदारांचे थेट नाव घेतलेले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते हे खेड- आळंदीचे आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आहेत. त्यांच्या प्रभावातून जिल्हाधिकारी सुहास दिवसे काम करत आहेत. तसेच सुहास दिवसे हे आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत असल्याचे कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची यापूर्वीच चौकशी सुरू केलेली असताना २८ मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा टाकला. दिवसे यांनी हे सर्व खेड-आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणीपूर्वी त्यांची बदली करावी, अशी मागणी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे . कट्यारे यांनी केलेल्या आरोपांमुळे पुणे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.