Khandoba Somvati Amavasya Yatra : जेजुरी : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे, तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल होत आहेत. सकाळी सात वाजता खंडोबा देवाच्या पालखीचं कऱ्हा स्नानासाठी गडावरून प्रस्थान झालं आहे. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर गर्दी करत आहेत. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेला आहे.
सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. जेजुरीत वाहन चालकांनी 13 नोव्हेंबर पहाटे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाले आहेत.
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा यंदा आज 13 नोव्हेंबरला भरत आहे. सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू होणार आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं कर्हा नदीवर स्नान सोहळा संपन्न होणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी सोमवती यात्रेच्या नियोजनाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.