उरुळी कांचन (पुणे) : पूर्व हवेलीतील खामगाव टेक – टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडले आहे. अज्ञात चोरट्यांनी मागील आठ दिवसांत तब्बल सात विद्युत रोहित्र फोडून, त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अज्ञात चोरट्यांनी नदीकाठच्या विद्युत रोहीत्रांना टार्गेट केले असल्यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे नदी, कालव्यातून मुबलक प्रमाणात पाणी वाहत असूनही चोरट्यांच्या करामतीमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केली जात आहे.
टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ज्ञानोबा जाधव यांच्या ऊसाच्या शेतामधील रोहित्र सोमवारी (ता. 06) रात्री चोरीला गेली. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र अजूनही उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे.
पूर्व हवेलीत विद्युत रोहित्र चोरीचा सपाटा सुरू असल्याने यामागचा मुख्य सूत्रधार शोधण्याचे आवाहन उरुळी कांचन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये म्हणून रोहित्राला महावितरण विभागाच्या वतीने वेल्डिंग करण्यात येत आहे. परंतु आता चक्क चोरटे वेल्डिंग तोडून विद्युत रोहित्र चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.
थ्री फेज वीजपुरवठा सुरु असताना रोहित्राची चोरी करणे म्हणजे मृत्यूशी खेळ करण्यासारखे आहे. परंतु चोरटे हे काम अतिशय खुबीने करत आहेत. यामुळे हे चोरटे निश्चितच विद्युत कामासंदर्भात प्रशिक्षित असावेत. रोहित्र चोरी केल्यानंतर तांबेची तार, इन्सुलेटीव्ह ऑइल चोरीस जात आहे. एका डिपीमधील (रोहित्र) ऑइल आणि धातूची किंमत अंदाजे ५० ते ६० हजारापर्यंत असते. अशी माहिती संबधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ..
विद्युत रोहित्र नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या शेतीमध्ये ऊस, रब्बी पिके, फळभाजी, पालेभाज्या, कांदा, भाजीपाला, यासारखी नगदी पिके आहेत. मोठ्या प्रमाणात ऊन पडत असल्याने पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवण्याची गरज असते. तसेच पाण्याची कमतरता जाणवल्यास फळशेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्याचे वर्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता असून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिवाशी खेळ करत धाडसी चोरी..
थ्री फेज वीजपुरवठा सुरु असताना रोहित्राची चोरी करणे म्हणजे मृत्यूशी खेळ करण्यासारखे आहे. परंतु चोरटे हे काम अतिशय खुबीने करत आहेत. यामुळे हे चोरटे निश्चितच विद्युत कामासंदर्भात प्रशिक्षित असावेत. रोहित्र चोरी केल्यानंतर तांबेची तार, इन्सुलेटीव्ह ऑइल चोरीस जात आहे. रोहित्रात ५० हजार मूल्याच्या तांब्याच्या कॉईल असतात तर क्षमतेनुसार १९० ते २०० लिटर पर्यंत ऑइल असते.
यावेळी कनिष्ठ अभियंता रमेश वायकर म्हणाले, मागील आठ दिवसांत सात रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी झाली आहे हि बाब खरी आहे. या रोहित्राच्या झालेल्या चोरीमुळे महावितरणाचे साडेतीन ते चार लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. रोहित्र बसविताना वेल्डिंग करून बसवीत आहोत. मात्र रात्रीच्या वेळी तीन फेज लाईट गेल्यानंतर हे रोहित्र चोरी जात आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलिसांना गस्त वाढण्याचे पत्र लवकरच देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कुणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्वरित महावितरण व उरुळी कांचन पोलिसांना माहिती द्यावी.
याबरोबर शेतकरी गोवर्धन टिळेकर म्हणाले, उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे लाईट जात आहे. रोहित्र चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. अगोदरच बिबट्याची परिसरात भीती आहे. दिलेली लाईट हि कमी प्रमाणात दिल्याने घरातील काही उपकरणे हि जळाली आहेत. परिसरात वारंवार रोहित्र चोरीला जात असल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.
तसेच यावेळी शेतकरी युवराज पिंगळे म्हणाले, रोहीत्रांमधून तांब्याच्या तारा वारंवार चोरी होत असल्याने शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तांब्याच्या तारा चोरणाऱ्या चोरट्यांना पकडून कडक कारवाई करावी. तसेच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळण्याच्या अगोदरच नवीन रोहित बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करावा.