खडकवासला : किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा निघृण खून केला. त्यानंतर पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. रविवारी (ता. २५) सायंकाळी एनडीएच्या पाठीमागील पिकॉक-बे परिसरात ही घटना घडली.
सोमनाथ सखाराम वाघ (वय ५३, रा. वारजे) आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी सोमनाथ वाघ याच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघ पती-पत्नी रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारायला जातो म्हणून दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक-बे परिसरात आले. रस्त्यालगत दुचाकी उभी करून, ते दोघे नेहमीप्रमाणे वॉक करण्यासाठी निघाले. रस्त्यावरून जाताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून अचानक वाद झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला.
दरम्यान, सकाळी अकरा वाजून गेले तरी दोघे घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने दोघांचा शोध घेतला. त्यावेळी सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात आढळली. त्या परिसरात शोध घेतला असता, मुलीला आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती दोघांनी उत्तमनगर पोलिसांना कळवली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक युसूफ शेख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चौरे, सहाय्यक फौजदार प्रसाद जोशी, कर्मचारी धनंजय बिटले तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.