प्रदिप रासकर / निमगाव भोगी : शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील तरुणीला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी करत विनयभंग केला. तसेच तरुणीच्या होणाऱ्या पतीला फोन करुन उलटसुलट बोलल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कैलास गावडे (वय २० वर्षे रा. तामखर वाडी, टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी हाजी येथील तरुणी गावातून महाविद्यालयात जात असताना सचिन गावडे वारंवार तिचा पाठलाग करत तिला रस्त्यात अडवून त्याच्याशी लग्न करण्याची मागणी करत होता. तसेच युवतीचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत तू माझ्याशी लग्न कर अन्यथा मी तुला जगू देणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ देखील केली.
दरम्यान, नुकताच युवतीचा साखरपुडा झालेला असताना सचिन याने युवतीच्या होणाऱ्या पतीला फोन करत युवतीबाबत उलटसुलट बोलून दमदाटी केली. याबाबत शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी सचिन गावडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे हे करत आहे.