पुणे : निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस विभागाने जिल्ह्यात परवानाधारक शस्त्र जमा केली आहेत.
त्यांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय निवडणूक निरीक्षकांना देण्यात यावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सी व्हीजील, खर्च, माध्यम संनियंत्रण समिती यांच्यासह इतर अहवाल वेळोवेळी द्यावेत, अशा सूचना या वेळी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.
निवडणुकीत रोकड, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत.
या वेळी पुणे शहरचे अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, आयकर विभागाचे आयुक्त जयेश आहेर, वस्तू व सेवा कर अतिरिक्त आयुक्त एम. एस. पन्हाळकर, पुणे प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक सुकदेव मोरे, मुख्य वनसंरक्षक राम धोत्रे आदी उपस्थित होते.