केडगाव : चौफुला परिसरात ये-जा करणाऱ्या पुरुषांना अश्लील हावभाव, हातवारे करून शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौफुला ते सुपा रोडवर पीएमटी बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाजवळ काही महिला अर्धनग्न कपडे घालून देहप्रदर्शन करत येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे केडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार बी.पी. शेंडगे, पोलीस हवालदार पी.एस. मस्के, महिला पोलीस शिपाई स्वप्नाली टिळवे आणि पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी तातडीने महिला पंच घेत माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेतली.
यावेळी बोरीपार्धी-चौफुला हद्दीत, केडगाव ते सुपा रोडवरील पुलानजिक पीएमटी बस थांब्याजवळ ६ ते ७ महिला अश्लील वर्तन करत पुरुषांना अश्लील हावभाव व हातवारे करून शारीरिक संबंधासाठी उत्तेजित करताना दिसून आल्या. याप्रकरणी मंगळवार (दि. ३) पोलिसांनी उरळी कांचन आणि दौंड परिसरातील ७ महिलांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी फिर्याद दिली आहे. सात महिलांवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व हातवारे करून लोकांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केडगाव पोलीस करत आहेत.