संदीप टूले
Kedgaon News: केडगाव: राष्ट्रीय प्राधिकरणाद्वारे न्हावरा- केडगाव-चौफुला राज्यमार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करण्यात आला. या बहुप्रतिक्षित रोडचे काम सुरु आहे. पण, या रोडच्या कामात रस्त्यावर खोदकाम कमी करण्यात येत असून, त्यात मुरूम न टाकता चक्क माती टाकण्यात येत आहे. रस्ता सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचा करण्यात आला तर हा रस्ता किती काळ टिकेल की नाही, हे राम भरोसे आहे. कारण हा रस्ता नेहमीच अवजड वाहनांनी गजबजलेला असतो. तसेच अष्टविनायक दर्शनासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे.
संबंधित कंत्राटदाराने माती मिश्रित मुरुमाचा सपाटा लावला आहे. याने दिवसभर रस्त्यावर धुळीचे सम्राज होत असून या मातीमुळे सर्वत्र फुपाटच फुपाटा होत आहे. चोपण मातीचा विशेष गुण म्हणजे मातीत ओलावा असेपर्यंतच घट्ट पकड ठेवणारी ही माती आहे. कोरडेपणा सुरू होताच ही माती धुळीत परिवर्तीत व्हायला सुरुवात होते. येथून गाडी चालवताना नागरिकांना अक्षरशः नाकी नऊ येत आहे. ही बाब शासकीय अधिकाऱ्यांना दिसत नाही? असा सवाल नागरिक सध्या उपस्थित करत आहेत. तसेच सुरू असलेल्या रस्त्याचे खोदकाम किती खोल आहे? त्यामध्ये कोणते साहित्य टाकले जाणार? मुरूम, गिट्टीचे थर किती इंचाचे व किती राहतील? वरचा थर कसा असेल? रस्त्यांची उंची किती असेल? या बाबतचा सविस्तर माहिती फलक काम करणाऱ्या कंपनीने मोबाईल नंबरसह रस्त्यालगत लावावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
संबंधित ठेकेदार हा गेली अनेक दिवसांपासून सर्रासपणे मुरूम ऐवजी मातीचा वापर करत आहे. तरी अभियंत्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. पण येथे आधिकरी काही फिरकताना दिसत नाही.
प्रशांत महारनवर, खोपोडी