संदीप टूले
केडगाव : लिंबो स्केटिंग हा स्केटिंगमधील सर्वात अवघड प्रकार समजला जातो. दोन पाय समांतर होतील एवढ्या खाली वाकून एका आडव्या बारखालून जावे लागते. यामध्ये केडगावच्या ५ वर्षीय ऋत्विक पराग कुंभार याने लिंबो स्केटिंग म्हणजे स्केटिंगवर स्ट्रेच करून जागतिक विक्रम केला आहे.
ऋत्विकने कुंभार याने ७ क्रेटा, चार चाकी गाड्या व ७ ज्वलंत लोखंडी पाईपखालून जमिनीपासून फक्त ९ इंच उंचीच्या जागेमधून ५० मीटर अंतर अवघ्या १९ सेकंदात पूर्ण करत जागतिक विश्वविक्रमाची नोंद केली. ग्लोबल जिनिअस रेकॉड या जागतिक रेकॉर्ड नोंद करणाऱ्या संस्थेने याची दखल घेतली. या संस्थेच्या माध्यमातून पंच म्हणून विशाल देसाई यांनी काम पाहिले. ऋत्विकने जागतिक विक्रम पूर्ण केल्याचे त्यांनी जाहीर केले.
लिंबो स्केटिंगसाठी ऋत्विकला ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक म्हणून समाधान दाने, गणेश घुगे, यश बारवकर, आकाश कसबे, खुशनंदन सिंग यांनी मार्गदर्शन केले. लिंबो स्केटिंग स्पर्धेवेळी ऋत्विकला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पूनम बारवकर, विद्यमान सरपंच शुभांगी धायगुडे, ‘आई’ सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका दाने, महाराष्ट्र पोलीस रुपाली टेंगले, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, केडगाव येथील समर्थ पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संदीप टेंगले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.