संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत म्हणून केडगाव ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते. याचे कारण म्हणजे येथे अनेक तालुका पातळीवरील नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गावच्या राजकारणात आपलीच सत्ता कशी येईल, यासाठी अहोरात्र पळताना नेहमीच पाहिले आहे. त्यामुळे सरपंच आपलाच व्हावा यासाठी अनेक जातीय समीकरणे जुळवली जात असायची आणि सर्व राजकारण हे समाज घटकांना धरून खेळी-मेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडायच्या.
प्रामुख्याने केडगावमध्ये मराठा, धनगर माळी, या समजाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. पण यंदाच्या केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जाती-पातीवरून बरेच राजकारण झालेलं पाहायला मिळाले. नेहमीचे प्रतिस्पर्धी कुल व थोरात गटाव्यतिरिक्त तिसऱ्या केडगाव विकास आघाडीचा नवीन प्रयोग ऐनवेळी अमलात आला आणि यशस्वीही झाला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये केडगाव विकास आघाडीच्या पूनम गौरव बारवकर यांची सरपंचपदी निवडूनही आल्या. पण त्यानंतर उपसरपंचपदासाठी जाती-पातीवरून राजकारण सुरू असल्याची चर्चा चालू झाली.
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्याचे पडसाद या केडगाव ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळाले. हेच मुद्दे पुढे करत केडगावची निवडणूक विकासावरून सरळ जाती-पातीवर जाऊन ठेपली.
जातीय तेढ आणखीनच वाढत जाणार?
केडगावमध्ये एका गटाकडून केडगाव विकास आघाडी (बहुजनांचा) उपसरपंच न होऊ देण्यासाठी कित्येक दिवसांचे कट्टर विरोधक कुल व थोरात गटाची युती झाल्याची चर्चा एका गटाकडून सगळीकडे पसरल्याचे चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात केडगाव आणि परिसरात जातीय तेढ आणखीनच वाढत जाईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
गावाच्या विकासासाठी विरोधक एकत्र येत असतील तर चांगलंय
केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुजन विरुद्ध मराठा समाज असा तेढ निर्माण करण्याचे काम काही समाजकंटक जाणूनबुजून करत आहे. कारण केडगावात दूषित वातावरण करून यांना स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची आहे. या सर्व गोष्टीला ही लोकं जबाबदार आहेत. गावाच्या विकासासाठी दोन विरोधक गट एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे.
– आप्पासाहेब हंडाळ, संचालक, भीमा पाटस कारखाना