राहुलकुमार अवचट
यवत : जपान यामा बोकि असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धा नुकतीच वात्सल्य बॅडमिंटन कोर्ट उंड्री-हडपसर (पुणे) येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, जपान, नेपाळ, चीन यांसह विविध देशांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. दौंड तालुक्यातील केडगाव येथील संस्कृती गुलाब पडवळ हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले.
संस्कृती हिने मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन, तिने उत्तम कामगिरी केली. संस्कृती पडवळ ही मार्शल आर्टचे शिक्षण ऑल मार्शल आर्ट कराटे, नेहरू युवा केंद्र संघटन, पुणे खेल मंत्रालय (भारत सरकार) येथे घेत आहे. तिला प्रशिक्षक अवधुत चिलवंत तसेच पालकांचा पाठिंबा व मार्गदर्शन लाभले.
केडगाव संस्कृती पडवळ या कन्येला आता ‘सुवर्णकन्या’ या नावाने नवी ओळख मिळाली आहे.