पुणे: पुण्यातील कात्रज-कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गास व उड्डाणपूलास सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास आज (दि. १०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी विनंती केल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता. या प्रतिष्ठानच्यावतीने कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशिन चौकातून ऊंड्री –पिसोळी रस्त्यावर बाळासाहेब देवरस एक हजार खाटांचे नियोजित रुग्णालय उभारणी सुरु आहे. त्यामुळे या चौकाला व भुयारी मार्गाला बाळासाहेब देवरस यांची नाव देण्याची विनंती होती. त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास मान्यता देण्यात आली.