पुणे : ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी आंबेगावमधील कातकरी वस्तीने लढा उभारला होता. त्यास अखेर यश मिळाले असून, राज्य शासनाने आंबेगावच्या या उर्वरित भागाला यापुढे बोरघर ग्रामपंचायत नावाने ओळखले जाईल, अशी अधिसूचना काढण्यात आली आहे.
डिंभे धरणामुळे आंबेगाव पूर्ण विस्थापित होऊन गावाचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन झाले. परंतु, यावेळी शिल्लक राहिलेली कातकरी वस्ती आणि इतर काही भाग सुमारे चाळीस वर्षे कोणत्याच ग्रामपंचायतीला जोडला नव्हता. येथील नागरिकांची शासन दरबारी कुठलीच ओळख नव्हती. कारण येथील नागरिकांची जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करून घेण्यास कोणतीच ग्रामपंचायत पुढे येत नव्हती.
त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू लागली, कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळणे अवघड झाले होते. मागील दहा वर्षांपासून बोरघर ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी नागरिकांचे विविध प्रयत्न सुरू होते. जिल्हा परिषदेने नुकतेच बोरघर ग्रामपंचायतीला जन्म, मृत्यूच्या नोंदी करून घेण्याच्या सूचना केल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण वस्तीसह म्हणजेच आंबेगाव उर्वरित क्षेत्र, बोरघर आणि वरसावणे हा महसुली गावाचा गट आता बोरघर ग्रामपंचायत म्हणून ओळखला जाणार आहे.