दीपक खिलारे
इंदापूर : शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने या हंगामामध्ये गाळप झालेल्या व होणाऱ्या सर्व ऊसाची बिले देण्याचे संपूर्ण नियोजन कारखान्याच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी दिली.
या हंगामामधील गाळपास आलेल्या सभासद व गेटकेन ऊसाचे काही पंधरवड्याचे पेमेंट बँक खात्यावर वर्ग झालेले आहे. उर्वरित पेमेंटही सभासदांचे बँक खात्यामध्ये लवकरच वर्ग करीत आहोत.
या हंगामामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्याने एकरी ऊसाचे उत्पादन घटले. तसेच सर्वच कारखान्यांना ऊसतोड कामगारांचा तुटवडा भासला. बऱ्याच वाहतुकदारांना तोडणी मुकादमांना ॲडव्हान्स देवूनही ऊसतोडीसाठी टोळया मिळाल्या नाहीत.
त्याचाही परिणाम गाळप क्षमतेवर झाला. परिणामी क्षमतेपेक्षा गाळप कमी झाले. कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प व सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहेत. त्यामुळे ऊस बिलास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी ग्वाही कार्यकारी संचालक यांनी यावेळी दिली.
कर्मयोगी कारखान्याने या हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाचे पेमेंट करण्यास थोडा विलंब झाला असला तरी कारखान्याची देय ऊसाची बिले, तोडणी वाहतुकीचे बिलांबाबत काहीही अडचण येणार नाही. याबाबत ऊसपुरवठादार, वाहतुकदार व सभासदांनी निश्चिंत रहावे.
त्याचबरोबर कामगारांचे पगारही वेळेवर चालू आहेत अतिरिक्त पर्जन्यमानाने ऊसाच्या प्रतवारीवर परिणाम होऊन त्याचा साखर उताऱ्यावरही परिणाम झालेला आहे. आणि याचा फटका जवळ-जवळ सर्वच साखर कारखान्यांना बसला आहे.
तसेच कारखान्याच्या ऊस बिलाबाबत कोणी काही गैरसमज करुन देत असतील तर सभासदांनी गैरसमज करुन न घेता याबाबत काही माहिती हवी असल्यास कारखाना कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.
कारखान्याचा २०२२-२३ चा गाळप हंगाम अडचणीचा असूनही सर्व ऊस उत्पादक सभासद, गेटकेन भागातील ऊस पुरवठादार व ऊस वाहतुकदार तोडणी मुकादम कामगार यांनी कारखान्यावर विश्वास ठेवून साथ दिलेली आहे. आणि त्याच विश्वासाला पात्र राहून पुढील उर्वरित बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी सांगितले.