दीपक खिलारे
इंदापूर : श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील हे इंदापूर तालुक्याचे आधारवड व श्रद्धास्थान आहेत. भाऊंनी घालून दिलेले आदर्श विचार हे आपणास काम करीत असताना क्षणोक्षणी प्रेरणा देत आहेत, भाऊंचे आशीर्वाद हीच आपणा कार्यकर्त्यांसाठी शिदोरी आहे, या भावपूर्ण शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपले काका कर्मयोगी शंकररावजी पाटील यांना ९९ व्या जयंतीदिनी इंदापूर तालुक्यामध्ये शनिवारी (दि.१८) विनम्र अभिवादन केले.
हर्षवर्धन पाटील यांनी सकाळी इंदापूर कॉलेज येथील शंकररावजी पाटील उर्फ भाऊंच्या समाधी स्थळाचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. तसेच बाजार समिती आवारातील शंकररावजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर बिजवडी येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोरील भाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार भाऊ आहेत. भाऊंनी घालून दिलेल्या विचारानुसार आपण सर्व कार्यकर्त्यांनी आगामी काळात वाटचाल करून, इंदापूर तालुक्याला प्रगतीपथावर नेऊ या, असे आवाहन सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले.