पुणे : कराड शरण आले हा शब्द योग्य वाटत नाही. शरण आले तरी समाधान नाही, तर त्याला अटक झाली पाहिजे होती. एक व्हिडिओ व्हायरल होतो, तरी आरोपी समोर येत नाही. चीड येणारे व्हिडिओ व्हायरल करून शरण होतात, हे दुर्दैवी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असलेला आरोपी वाल्मिक कराड याने पुणे येथे सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन सरेंडर केलं. त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला आहे. या बद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे नेमकं काय बोलल्या?
सुप्रिया सुळे म्हणल्या की, एकतर परभणी आणि बीड या दोन्ही घटना महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. दोन्ही कुटुंबीयांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि आम्ही पण घेतली आहे. शरद पवार हे या कुटुंबांना भेट देणारे पहिले नेते होते. त्यानंतर तपासाला वेग आला. पोलीस आणि मीडिया आरोपीचा शोध घेत आहे याचीच गंमत वाटते. असही सुप्रिया सुळे बोलल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, गेले अनेक आठवडे या विषयाचा चॅनलवर रोष दिसत आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीचे कौतुक केले तितके कमीच आहे. जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राजकारण बाजूला ठेवून एकत्र लढायला हवं आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. पुढे त्या म्हणल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि अजित पवार त्यांचे मित्र पक्ष आहेत. नैतिकतेने विचार केला तर ते न्याय देतील. थोडा संवेदनशीलपणा त्या कुटुंबीयांसाठी दाखवावा. बीडमध्ये झालेल्या मोर्चामध्ये एकसुद्धा राजकीय पक्षाचे नव्हते त्यामुळे अजूनही माणुसकी जिवंत आहे. असंही सुळे म्हणाल्या.