केडगाव / संदीप टूले : कांद्याला सुरूवातीला प्रतिक्विंटल सरासरी चार ते साडेचार हजार रूपये दर मिळत होता. मात्र, आता जेमतेम 300 ते 800 रुपये कवडीमोल दर मिळत आहे. यात लागवडीचा खर्च निघणे तर सोडाच; पण पदरचे जास्त पैसे मोजण्याची वेळ आता शेतक-यांवर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात हवामान बदलामुळे कांदा पिकाला भरमसाठ खर्च करून हे पीक आणावे लागत असून ऐन विक्रीच्या वेळेस बाजार पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली निर्यातबंदी, त्यातच अलिकडे हिट ॲन्ड रन प्रकरणात केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कायद्याच्या विरोधात माल वाहतूकदारांनी पुकारलेला संप व अन्य कारणांमुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून कांदा दराची घसरण सुरूच आहे. काही ठिकाणी तर एक दिवसाआड कांदा लिलाव होत असल्यामुळे लिलावाच्या दिवशी होणारी कांदा आवक जास्त वाढते. यामुळे पण कांद्याचे भाव पडण्यास आणखीनच मदत मिळत आहे. त्यात हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतातील आहे त्या परिस्थितीत काढून आणलेला कांदा, मातीमोल भावाने की होईना विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लागवड, मजुरी, औषध फवारणी, कापणी आणि वाहतूक या बाबींवर होणारा खर्च विचारात घेताला तर कांद्याला प्रतिक्विंटल किमान चार ते साडेहजार रूपये मिळणे अपेक्षित आहे. पण दर घसरणीमुळे आर्थिक ताळमेळ पूर्णतः विस्कटून गेल्यामुळे कांद्याने वांदा केल्याचे शेतकरी सांगतात.
तर काही शेतकरी म्हणाले की, यंदा कांदा पिकाचा वाहतूक खर्चही निघाला नाही. कांदा दर कोसळत असताना तयार झालेला कांदा शेतात तसाच ठेवला तर तो नासून जातो आणि जास्त नुकसानच होते. त्यामुळे ‘फूल ना फुलाची पाकळी’ समजून पडेल किंमतीत कांदा विकावा लागत आहे.