राजू देवडे
लोणी धामणी : सध्या पूर्व आंबेगावातील अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. ग्रामस्थ भयभीत होत आहेत. सातच्या आत घरात, हा जणू रिवाज होत आहे. बिबट्याचा हा प्रजनन काळ आहे. साखरेचा हंगाम सुरू असल्यामुळे ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऊस क्षेत्रात बिबट्याला लपण्यास जागा मिळते. खाद्यही मिळते. मात्र, तोडणी सुरू असल्यामुळे बिबट्या दररोज वास्तव्याचे ठिकाण बदलत आहे. त्याचाच परिणाम म्हणून दुष्काळग्रस्त व डोंगरी भागात सुद्धा बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे. बिबट्याचे हल्ले होत आहेत. रात्री पाणी भरण्यासाठी शेतात जाण्याचीही दहशत नागरिकांमध्ये आहे. प्रसंगी कठोर उपाययोजना राबवून सरकारने बिबट्याच्या दहशतीमधून सामान्य शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची मुक्तता करावी, अशी मागणी होत आहे.
आंबेगाव परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्या राजरोसपणे मानवी वस्तीमध्ये फिरताना दिसून येत आहे. धामणी (ता. आंबेगाव) येथील द्रौणागिरी मळ्यातील पिराच्या मंदिराजवळ गोपालक शेतकरी अमित जाधव यांचा घराजवळ मुक्त संचार बंदिस्त गोठा आहे. या गोठ्यात लहान मोठी १८ जनावरे आहेत. गोठ्याला तारेचे कंपाऊंड आहे. याच कंपाऊंडच्या खालून दोन दिवसांपूर्वी साधारण रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला. गोठ्यातील १३ महिन्यांच्या कालवडीला कंपाऊंडच्या बाहेर नेऊन ठार मारले. सकाळी जाधव दूध काढण्यासाठी गोठ्यात आले असता, ही घटना त्यांच्या लक्षात आली. या घटनेत शेतकऱ्याचे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाच्या वनपाल सोनल भालेराव यांच्याशी संपर्क साधला. भालेराव यांनी वनकर्मचारी दिलीप वाघ यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी पाठवले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी केली. या परिसरात बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जनावरांवर बिबट्याने अनेक वेळा हल्ला करून जनावरांना ठार केले आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव व येथील शेतकऱ्यांनी केली आहे.