राहुलकुमार अवचट
यवत : यवतचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात दरवर्षी कालाष्टमीनिमित्त साजरा होणारा श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. जन्मोत्सव सोहळा २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी समस्त ग्रामस्थांच्यावतीने कलश, ग्रंथ व विणा पूजन करण्यात आले. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रोज काकड आरती, महापूजा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरीजागर यांसह सुश्राव्य किर्तन होणार आहे.
सप्ताहादरम्यान होणाऱ्या कीर्तन सोहळ्यासाठी गायनाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज घुले (परभणी), ह.भ.प. नानासाहेब शितोळे महाराज (पाटस), ह.भ.प. विष्णुपंत पांढरे, ह.भ.प. विनोद महाराज झेंडे (पाटस), ह.भ.प. उत्तम ढवळे महाराज (वडगाव रासाई), ह.भ.प. बाळासाहेब टेमगिरे महाराज (भरतगाव), मृदंगाचार्य ह.भ.प. विजय महाराज धर्माधिकारी (माळशिरस), ह.भ.प. वैभव महाराज गायकवाड (कासुर्डी), ह.भ.प. गुणाजी महाराज फुले (आळंदी) यांसह विठ्ठल समाज भजनी मंडळ हे साथ-संगत करणार आहेत. ह.भ प. शंकर महाराज उंडे (आळंदी) हे व्यासपीठ चालक असणार आहेत.
सप्ताह काळात रोज दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यवत व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळभैरवनाथ देवस्थान व इतर देवस्थान ट्रस्ट, विठ्ठल समाज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ, यवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.