लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागाने कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात छापे टाकून सुमारे साडे तीन लाखांची वीजचोरी उघडकीस आणली. याप्रकरणी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यासह दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी रामप्रसाद सुखदेव नरवडे (वय ३३, रा, मांजरी ग्रीन वूड वसाहत, शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अविनाश विजय बडदे (ग्रामपंचायत सदस्य) व चंद्रकांत शंकर रोकडे (दोघेही रा. संभाजी नगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामप्रसाद नरवडे हे महावितरणाच्या लोणी काळभोर शाखेत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. लोणी काळभोर शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ग्राहकांकडून वीज बिल थकबाकी वसुली करणे, वीजचोरी शोधणे, पी.डी. ग्राहकांकडून थकबाकी वसुली करणे, असे आदेश महावितरणाच्या उरुळी कांचन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी धम्मपाल पंडीत यांनी दिले होते.
अशी केली जायची वीजचोरी…
पहिल्या घटनेत कदमवाकवस्ती मधील पी.डी. ग्राहक तान्हाजी लक्ष्मण सावने तर वीज ग्राहक अविनाश विजय बडदे हे आहेत. सावने यांनी थकबाकी ५९ झाल्याने महावितरणाने त्यांचा मीटर काढून आणला होता. महावितरणाचे अधिकारी तपास करत असताना अविनाश विजय बडदे हे विजेचा अनधिकृतपणे वापर करत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या घटनेत, कदमवाकवस्तीमधील संभाजीनगर परिसरात असलेल्या सिद्धीविनायक कृपा या इमारतीमधील पी. डी. ग्राहक नावे चंद्रकांत शंकर रोकडे यांच्याकडे १५ हजार ४२० रुपयांची वीज बिल थकबाकीमुळे त्यांचा मीटर काढून आणलेला होता. तेव्हा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना तपासणीत सदर ठिकाणी वीज पुरवठा चालू असल्याचे दिसून आले. त्यानंतर वीजपुरवठ्याची पाहणी केली असता, चंद्रकांत रोकडे यांनी डायरेक्ट विद्युत पुरवठा जोडला होता. चंद्रकांत रोकडे हे थकबाकी असलेल्या ठिकाणी विजेचा अनधिकृतपणे वापर करत असल्याचे दिसून आले.
साडे तीन लाखांची वीजचोरी
अविनाश बडदे यांनी महावितरणची ५९ हजार ८० थकबाकी व मागील तीन वर्षापासून चोरून वापरलेली विजेचे १ लाख २९ हजार ६१४ रुपये असे एकूण १ लाख ८८ हजार ९६४ रुपये महावितरणचे नुकसान केले आहे. तर रोकडे यांच्याकडे महावितरणची १५ हजार ४२० रुपये थकबाकी व मागील सहा वर्षापासून चोरून वापरलेली विजेचे १ लाख ३८ हजार ८४२ असे एकूण १ लाख ५४ हजार २६२ रुपये महावितरणचे नुकसान केले आहे. असे दोघांनी मिळून ३ लाख ४३ हजार २२६ रुपयांची वीज चोरून महावितरणाचे नुकसान केले आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
याप्रकरणी रामप्रसाद नरवडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.
ही कामगिरी महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाने उपकार्यकारी अधिकारी धम्मपाल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोरचे सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे, उरुळीकांचन लेखा विभागाच्या अधिकारी श्वेता दळवी, महावितरण कर्मचारी सिराज सय्यद, विद्युत सहाय्यक व कर्मचाऱ्यांनी केली आहे.