पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे. शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख आणि दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या शरद पवार गटाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, मेटे या शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच बीड लोकसभेबाबत निर्णय घेतील, अशी माहिती मिळत आहे.
ज्योती मेटे या येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन बीड लोकसभा लढण्यासंबंधीचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती शिवसंग्राकडून मिळत आहे. मेटे यांनी १७ मार्चला देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार गटाकडून त्या बीडच्या मैदानात उतरल्यास पंकजा मुंडे विरूद्ध ज्योती मेटे अशी चुरशीची लढाई होऊ शकते. शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे गेल्यावर्षी अपघाती निधन झाल्यानंतर शिवसंग्रामची जबाबदारी सध्या ज्योती मेटे यांच्याच खांद्यावर आहे. त्या अजूनही शासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.