सागर जगदाळे
भिगवण : काही दिवसांपूर्वी सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाचे भरावाचे दगड निसटले होते. खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम विभागाने या पुलावरून होणारी जड वाहतूक बंद केली असून दुचाकी सोडून इतर कोणत्याही चारचाकी वाहनांना पुलावरून वाहतूक करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुलाला महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी उपस्थित असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उबाळे व वाघ यांनी सद्यस्थितीत असणारी पुलाची एकंदरीत अवस्था सांगितली व त्यासाठी घेत असलेली खबरदारी पर उपाय ही सांगितले.
सदर पूल बंद झाल्याने सुमारे २५ ते ३० गावांचा संपर्क तुटला असून भिगवणला जायचे असल्यास किमान ३० किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. त्यामुळे रुग्णांसाठी हे अंतर जीवनघेणे ठरत असून ही संपर्क तुटलेली गावे वैद्यकीय सेवेसाठी भिगवण शहरावर अवलंबून असल्याची व्यथा कोंढार चिंचोलीच्या ग्रामस्थांनी सांगितली.
ग्रामस्थांच्या व्यथेवर बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने शासन दरबारी पुढाकार घेणार असल्याचे सांगताना आगामी २ ते ३ दिवसात पुलाच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक बनविण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या. मिळालेल्या अंदाजपत्रकाला घेऊन पुलाच्या डागडुजीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सोलापूर व पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे देखील भरीव निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी पुलाला भेट दिल्यानंतर सांगितले.
यावेळी कोंढार चिंचोलीचे सरपंच शरद भोसले, भिगवण गावचे माजी सरपंच पराग जाधव, संपत बंडगर, जेष्ठ नेते अशोक शिंदे, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य सुनील काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.