राजेंद्रकुमार शेळके
Junnar News : जुन्नर : रानभाज्या म्हणजे जंगलात आपोआप उगवणाऱ्या भाज्या. या रानभाज्या जंगल परिसरात आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा हा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न आहे. कोणतेही खत किंवा कीटकनाशक नाही. कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच असते. मुळशी तालुका रानभाज्यांनी समृद्ध आहे. लोक पुन्हा सेंद्रिय शेती आणि भाजीपाला पीकाकडे वळत आहेत. सेंद्रिय अन्नधान्य खाण्याकडे समाजाचा कल वाढला आहे, ही समाधानाची बाब आहे. पिझ्झा-बर्गरपेक्षा आपली रानभाज्यारूपी ग्राम खाद्यसंस्कृती आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे, असे मत पिरंगुटचे माजी सरपंच मोहन गोळे यांनी व्यक्त केले.
अनंतराव पवार महाविद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे या महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन माजी सरपंच मोहन गोळे यांनी केले. (Junnar News ) त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राजेंद्र पवळे, महादेव अण्णा गोळे, प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. प्रवीण चोळके उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना महादेव अण्णा गोळे म्हणाले की, आपली ग्राम खाद्यसंस्कृती आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या की, आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांना विशेष महत्त्व आहे. (Junnar News ) आपल्या सण समारंभातही त्या-त्या ऋतुनुसार उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. शहरातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख आणि माहिती व्हावी, यासाठी असे महोत्सव आयोजित करणे गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. मुळशी तालुका हा अनेक नैसर्गिक व विविध जैविकदृष्ट्या संपन्न असल्याने अनेक प्रकारच्या रानभाज्यांनी समृद्ध असा भाग आहे. (Junnar News ) अनेक विद्यार्थ्यांनी रानभाज्या महोत्सवात घेवडा, केळ फूल, तांदूळजा, तोंडली, राजगिरा, अंबाडा, आळू, दुधी भोपळा, लाल माठ, चवळी, कांदा पात, डेट, पुदिना, दोडका, आर्वी, रान काकडी, पडवळ, राजमा, कारले, सुरण, मोहर, हादगा, शिंगाडा, गवती चहा, भोपळा फूल अशा विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. मिनाली चव्हाण यांनी केले. (Junnar News ) आभार प्रा. डॉ. रेखा जोशी यांनी मानले. रानभाजी महोत्सवाचे श्रेय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांना जाते. यापुढेही रानभाज्या महोत्सव प्रामुख्याने पुणे शहरातील विविध महविद्यालयांत राबविले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : बेकायदा गावठी पिस्तूल वापरणाऱ्याला नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या