राजेंद्रकुमार शेळके
Junnar News : जुन्नर : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अनेक अग्नीबाणांची निर्मिती केली. पोखरणची अणु चाचणी फार गुप्तपणे केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ही व्यक्ती देशाच्या मातीशी, संस्कृतीशी एकनिष्ठ असणारी होती. देशामध्ये मुस्लिम समाजाबद्दल सलोख्याची भूमिका त्यांनी रूजवली. मात्र, आज प्रत्येक मुसलमान राष्ट्रविरोधी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे दुर्दैव आहे. राष्ट्रप्रेमी मुस्लीम समाजाची एक मोठी परंपरा आहे. राष्ट्र प्रेम जपणे हा कलाम यांचा विशेष गुण होता. त्यांच्या कार्याचा देशाला विसर पडू नये, हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने कलाम यांची जयंती साजरी
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती एस. एम. जोशी सभागृहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम संघटनेचे प्रमुख फिरोज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. या वेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. (Junnar News ) या वेळी डी. वाय. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विद्यानंद मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले, रमाबाई पुत्र विठ्ठल गायकवाड, युवा नेते प्रमोद दिवेकर, पुणे मिडिया लाइव्हचे संपादक महेबुब सरजेखान, जनशक्ती विकास संघटनेचे अध्यक्ष आसिफभाई खान, हालिमाताई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांनी केले.
या वेळी ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आले. गौसिया खान, निलिमा गायकवाड, लेफ्टनंट डॉ. यासीन शेख, सतिश भांगर, पत्रकार वसंत रांधवण, रहिमभाई सय्यद आदी मान्यवरांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. या वेळी बोलताना डॉ. सबनीस म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि बिनविरोध त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली. कलाम मुस्लिम धर्मीय असले तरी उदारमतवादी, सर्वधर्मसमभावाची भावना जपणारे होते. कर्मठ जातीवाद त्यांना कधीही मान्य नव्हता. (Junnar News ) मानवतेचा संदेश त्यांनी दिला. कलाम निवृत्तीनंतर राष्ट्रपती भवनातून बाहेर पडत असताना त्यांच्या हातात फक्त दोन जून्या बॅग होत्या. त्यामध्ये अवघे चार शर्ट-प्यॅंट, तीन सूट व अडीच हजार पुस्तके होती. भारतरत्न, पद्मभूषणस, पदमश्री, डॉक्टरेट असलेल्या या व्यक्तीकडे एकच घर होते. संशोधन करण्यासाठी ते त्यांना भेट दिले होते. त्यांनी त्यांची पेन्शन देखील गावातील शाळेला दान केली. मिसाईल मॅन कलावंत कलामांच्या भूमिकेत अनेक कला होत्या.
या कार्यक्रमाला महिला कार्याध्यक्षा सिंधुताई तुळवे, महिला प्रदेश संघटक ज्योती झरेकर, पुणे शहर अध्यक्ष रमाकांत शर्मा, पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे, पुणे शहर संपर्क प्रमुख संदीप शेंडगे, पुणे जिल्हा महिला संपर्क प्रमुख विजया खटाळ, पिंपरी-चिंचवड महिला शहर अध्यक्षा शुभांगी शिंदे, पुणे शहर युवक अध्यक्ष ऐमान शेख आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदभाई बलबट्टी यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : बेकायदा गावठी पिस्तूल वापरणाऱ्याला नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या