शुभम वाकचौरे
Junnar News : जांबूत : बिबट्याच्या हल्ल्यात दूर्दैवी मृत्य झालेल्या आळे (ता. जुन्नर) येथील शिवांश अमोल भुजबळ या मुलाच्या आईची मनस्थिती ढासळली आहे. ‘मला माझ्या मुलाकडे जायचे आहे, तो शाळेत गेला आहे, त्याला आणायला मला जायचे आहे…’ असा टाहो फोडत मुलाच्या विरहात त्यांनी गुरुवारी (ता. १२) पहाटे विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांना आळेफाटा येथील फडतरे हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न
आळे गावातील तितर मळ्यातील अमोल भुजबळ यांच्या घरातील अंगणात खेळत असलेल्या शिवांश भुजबळ या चार वर्षांच्या बालकावर ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. (Junnar News) या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवांशचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ही दुर्घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेमुळे आळे ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे.
शिवांशचा मृत्यू झाल्याची बातमी कळल्यानंतर त्याच्या आईची मानसिक स्थिती ढासळली आहे. याच मनोवस्थेतून त्यांनी विषारी औषध प्राशन करून, स्वतःचेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. (Junnar News) दरम्यान, पहाटेच्या सुमारास त्यांनी विषारी औषध घेतल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवताच, वन विभागाच्या गाडीतून त्यांना आळेफाटा येथील फडतरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, निलेश शिंदे यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुलाचा दूर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्या सतत ‘मला शिवांशकडे जायचे आहे,’ असे बोलत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
बिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांत ५ बळी
वनविभागाकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या ९ महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या पाच झाली आहे. (Junnar News) जानेवारी ते एप्रिल या सलग चार महिन्यांत चार बळी गेले. तर शिवांशच्या रुपात पाचवा बळी गेला असून, एकूण १० जण आतापर्यंत जखमी झाले आहेत. चारच दिवसांपूर्वी आळेफाटा परिसरात आगरमळा येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता, यामध्ये तो थोडक्यात वाचला आहे.
या परिसरात सातत्याने होणाऱ्या बिबट्यांच्या उपद्रवाची दखल घेऊन पिंजरे लावून त्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास, आळेफाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्ना डोके यांनी दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : राजूर येथे जागतिक हृदय रोग दिनी शंभर रुग्णांची हृदय रोग, रक्तदाब तपासणी