जुन्नर : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे बदलली. काही नेते आणि कार्यकर्ते अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आजपर्यंत तटस्थ भूमिका घेतली होती. आता बेनके यांनी अजित पवार गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, सत्ता संघर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच जुन्नर विधानसभेचा दौरा करत आहेत. आजपर्यंत तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनकेंनी यांनीच हा दौरा आखल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आमदार अतुल बेनके हे नेमके शरद पवारांच्या गटात सामील होणार की अजित पवारांच्या गटात सामील होणार, असा प्रश्न होता. आजपर्यंत ते तटस्थ राहिले. मात्र, आता अतुल बेनके हे अजित पवारांच्या गटात सामील होणार आसल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त मतदारसंघात झळकलेल्या फ्लेक्सवर शरद पवारांना स्थान नाही. शरद पवार यांनी जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा घेऊन दोन आठवडेही उलटले नाहीत तोच बेनके यांनी अजित पवार यांच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावरून बेनके आता अजित दादांच्या गटात सामील झाल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आज होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात बेनके यावर शिक्कामोर्तब करणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अतुल बेनके यांना जुन्नरमध्ये पर्याय उपलब्ध करुन दिला. शरद पवारांनी ऑफर दिली तर जुन्नर विधानसभा मी लढवणार, असे काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांनी शरद पवार हे जुन्नर दौऱ्यावर असताना म्हटले होते. आपली भूमिका जाहीर न केलेल्या अतुल बेनके यांना शरद पवारांनी राजकीदृष्ट्या घेरायला सुरूवात केल्याची चर्चा रंगली होती. हे सगळं घडल्यानंतर लगेच अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता थेट बेनके यांनी अजित पवार गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे.
जुन्नर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी आमदार अतुल बेनके हे निवडून आले आहेत. आपण कुणाच्याही गटात नाही, आपली निष्ठा फक्त पवार कुटुंबीयांसोबत आहे असं जरी अतुल बेनके म्हणत होते तरी त्यांची अजित पवारांशी जवळीकता सर्वश्रूत होतं. त्यामुळे ते कधीही अजित पवार गटात जातील याची शक्यता नाकारता येत नव्हती अखेर त्यांनी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.